नवसपूर्तीसाठी रेवड्यांची उधळण; भाविकांची अलोट गर्दी
खुलताबाद, (प्रतिनिधी) : म्हैसमाळ येथील गिरिजामातेची माघ पौर्णिमेनिमित्त भरणारी भव्य यात्रेला रविवारी उत्साहात सुरूवात झाली. यावेळी भाविकांनी नवसपूर्तीसाठी रेवड्यांची उधळण करत गिरिजामातेच्या चरणी श्रद्धा अर्पण केली.
यात्रेची सुरुवात पारंपरिक काठीस्थापना विधीने करण्यात आली. पहाटे पाच वाजता महापूजा व विशेष अलंकार पूजा तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाली. झाली. जय गिरिजामाता च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. यावेळी हिाराष्ट्रासह मराठवाड्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी गिरिजामातेच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे.
चार दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त म्हैसमाळ परिसरात मोठी बाजारपेठ थाटण्यात आली आहे. खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य, फुलांचे हार, खेळणी, बांगड्या, साडी-चोळी तसेच रेवड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहेत. मंदिर परिसर स्वच्छ व प्रशस्त करण्यात आला असून संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
--- परिसरात कडकोट पोलीस बंदोबस्त ----
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गिरिजामातेचा हा यात्रामहोत्सव बुधवारी (दि. ४) सकाळी महाभिषेकाने संपन्न होणार असून, तोपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमामुळे म्हैसमाळ परिसर भत्ति भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. त्यानतर यात्रेची सांगता होणार आहे.












